सोनाराच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद.
सहा दरोडेखोरासह 5 लाख 40,000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त;बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) – बीड तालुक्यातील होळ ते डिघोळअंबा मार्गावर सोनारास डोळ्यात तिखट चटणी टाकून व चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी सोनार हा सोने विक्रीसाठी जुन्या डिघोळअंबा रोडने मोटारसायकलवरून जात असताना दर्ग्याजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्याचा मार्ग अडवला. आरोपींनी त्याच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पसार झाले.
या प्रकरणी पोलीस ठाणे युसुफ वडगांव येथे गु.र.नं. 46/2026 कलम 309(6) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याचे पथक प्रयत्नशील होते.
तपासादरम्यान जवळपास 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे संशयित रोहित रंजीत धिमधिमे यास अंबाजोगाई बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सुदाम गणपत सोनवणे (रा. डिघोळअंबा, ता. धारूर) व पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार वीरसिंग रिसपालसिंग टाक (रा. अंबाजोगाई) यांच्या सांगण्यावरून इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यानुसार अभिषेक अशोक घाटुळ (रा. कन्हेवाडी, ता. परळी), कानिफनाथ विलास डुरकर (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि यशोदिप कल्याण किर्दन (रा. सातेफळ, ता. अंबाजोगाई) यांना अटक करण्यात आली. एकूण सहा आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली (कि.अं. ₹1,50,000), सहा मोबाईल (कि.अं. ₹90,000) तसेच जबरदस्तीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने (कि.अं. ₹3,00,000) असा एकूण ₹5,40,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे युसुफ वडगांव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, तसेच शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व पथकातील पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गिते, पो. हे.भागवत शेलार, पोमारुती कांबळे, दिपक खांडेकर, गणेश मराडे, विकी सुरवसे यांनी केली.




