
बीड, दि. २७ (प्रतिनिधी)बीड शहराला १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत असलेल्या बीड शहरात आणखी एक गंभीर घटना घडली आहे. बार्शी नाका परिसरातील शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक फुटली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून काही काळ परिसरातील वाहतूकही विस्कळीत झाली.
रात्री 11 वाजता अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक घराबाहेर धावले असता बार्शी नगर चौकातील मुख्य पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास आले. पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. आधीच बार्शी नाका परिसरात १५-१५ दिवस पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच अशा प्रकारे पाण्याची नासाडी झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाण पुलाचे आणि रस्त्याचे काम सुरू असताना योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली. काही दिवसांपूर्वीही याच भागात पाईपलाईन फुटल्याची घटना घडली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोच पुन्हा पाईपलाईन फुटल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षी पाईपलाईनचे देखभाल व दुरुस्तीचे काम केल्याचा दावा नगर परिषदेच्या वतीने केला जातो. “पाण्याचा एक-एक थेंब अमूल्य आहे” अशा जाहिराती केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक करत आहेत.
प्रशासनाने प्रथम स्वतःची यंत्रणा सक्षम करावी आणि अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




