ब्रेकिंग न्यूज

बिबट्याचे पुन्हा दर्शन !

शेतकऱ्यात भीतीचे वातावरण;बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला अपयश.

बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. ग्रामीण भागात वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी तालुक्यातील वांगी गावाजवळील वस्तीत बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून अनेक शेळ्या ठार केल्या होत्या. तसेच चौसाळा परिसरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे ग्रामस्थ अधिक सतर्क झाले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास धास्तावले आहेत.

दरम्यान दि. 14 फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बीड तालुक्यातील लिंबागणेश–वरवटी या रस्त्यावर नागझरी गाव जवळील मंदिराच्या बाजूला बिबट्या दिसून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अचानक बिबट्या नजरेस पडताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यात व ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या वारंवार होत असलेल्या दर्शनामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून रात्री शेतात जाणे टाळत आहेत. वनविभागाने तातडीने पथक पाठवून पाहणी करावी, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. प्रशासनानेही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button