चारचाकीने धडक दिल्याने ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू.
बीड/मांजरसूंबा रस्त्यावरील कोळवाडी येथील दुर्दैवी घटना.

बीड(प्रतिनिधी) बीड–मांजरसूंबा रस्त्यावरील कोळवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि. १०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमएच 13 डीजी 3355 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरमध्ये बसलेला एक ऊसतोड मजूर रस्त्यावर पडला. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून वाहनाचे टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
धडकेनंतर चारचाकी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन आढळली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती ट्रॅक्टरमधील ऊसतोड मजूर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेडकॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अद्याप नाव, ठिकाण समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऊस तोडीचा हंगाम संपत असल्याने ऊसतोड मजुर आपल्या गावाकडे परतत असून मजुराचा असा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




