ब्रेकिंग न्यूज

बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला रामेश्वर मृतावस्थेत सापडला.

बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील अंबिका नगर परिसरातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रामेश्वर मोहन शिंगणे (उर्फ गोरख) असे मृत तरुणाचे नाव असून, तो शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी घरातून बाहेर पडला होता. काही कारणास्तव तो रागाच्या भरात घराबाहेर गेला असल्याचे त्याने आईला सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही.

याप्रकरणी त्याच्या आईने तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली होती. आज सकाळी अंबिका नगर परिसरातील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह दिसून आल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलगेकर, उपनिरीक्षक कैलास अन्नादास, बीट अंमलदार अंजन गडदे व पोलीस कर्मचारी नारायण काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या, मात्र नातेवाईकांनी कपड्यांवरून ओळख पटवली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला असून मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button