बनावट ताडी(दारू)वर पेठ बीड पोलिसांची कारवाई.
दारू बंदी अधिकारी झोपेत;पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून आरोपीसह ताब्यात ७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यांपासून बनावट ताडी व दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पेठ बीड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. बार्शी नाका पोलीस चौकीचे पोलीस जमादार भोले यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवले.
या कारवाईदरम्यान बार्शी रोडवरील कॉलेजच्या मागील बाजूस एका शेतात बनावट दारू तयार करत असताना एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.ही कारवाई दिनांक २७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केली.पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता बनावट दारू तयार करण्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले असून सुमारे ७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड शहरात बनावट दारूची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून अनेक आजारांचा धोका वाढत असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. बीड दारूबंदी अधिकारी झोपेची सोंग घेत असल्याचे दिसत आहे.
ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार भोले व पोलीस अल्ताफ शेख यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू असून बनावट दारू विक्रीच्या साखळीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.








