परळीत पत्नीच्या विजयानंतर पतीने हवेत उधळल्या नोटा.
विजयी मिरवणुकीत पैसे उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील परळी शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर एक वादग्रस्त प्रकार समोर आला असून, नियमाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे. नोटा उधळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभाग क्रमांक ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या नगरसेविका खैसर राजा खान यांच्या विजयानंतर काढण्यात आलेल्या आनंदोत्सव रॅलीदरम्यान त्यांच्या पतीने हवेत नोटा उधळल्याचे स्पष्टपणे व्हिडिओत दिसत आहे.
नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यात सर्वत्र विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण, फटाके आणि रॅलीद्वारे आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, परळी शहरातील या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विजयी रॅलीदरम्यान खास गाण्यांची ध्वनीव्यवस्था करण्यात आली होती. या रॅलीत उत्साहाच्या भरात नगरसेविकेच्या पतीने नोटा हवेत उधळल्याचा प्रकार घडला. हा प्रसंग कोणीतरी मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केल्याने तो वेगाने व्हायरल झाला आहे.
या प्रकारामुळे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने पैशांची उधळण करणे नियमबाह्य असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोग किंवा संबंधित प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती व पक्षावर कोणती कारवाई होणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून राजकीय वातावरण तापले आहे.








