ब्रेकिंग न्यूज

आ.धस यांची बदनामिकारक पोस्ट केल्याने समर्थक आक्रमक.

आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली SP नवनीत कॉवत यांची भेट.

बीड – आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन समाजमाध्यमांवर आमदार सुरेश अण्णा धस यांच्याविरोधात बेताल, बदनामीकारक आणि वातावरण बिघडविणाऱ्या पोस्ट करणाऱ्या मनोज चौधरी याच्यासह इतरांवर तात्काळ दखलपात्र गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे संयुक्त निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या 35 वर्षांपासून जनसेवेत कार्यरत असलेल्या आमदार धस यांच्या प्रतिमेला योजनाबद्ध पद्धतीने डागाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सोशल मीडियावर अपशब्द, शिवीगाळ, अश्लाघ्य आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा वापर केला जात असून जनतेमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड येथील अलीकडील सभेमध्येही मनोज चौधरीने खुलेआम गैरवर्तन करत आमदार धस यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याने संबंधिताविरोधात कठोर, तात्काळ आणि कायदेशीर कारवाई अपरिहार्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या संयुक्त निवेदनावर सुमारे 250 ते 300 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून या मुद्द्याला जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असल्याचे यातून अधोरेखित झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील अवैध व बदनामीकारक कृत्यांना आळा बसणे आवश्यक असल्याचे सांगत, अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रतिनिधीमंडळाला दिले.

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती, एकमुखी भूमिका आणि गंभीर स्वरूपाचे आरोप लक्षात घेता या प्रकरणाकडे आता जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले असून आगामी काळात पोलिसांकडून कोणती पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button