ब्रेकिंग न्यूज

परळीत गोळीबाराची धक्कादायक घटना.

सात राऊंड फायर;नामांकित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील परळी शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रकारामुळे चर्चेत आले आहे. मागील काही महिन्यांत धमकावणे, मारामाऱ्या, हवेत गोळीबार,अपहरण अशा सलग घटनांनी त्रस्त झालेल्या परळीत आता गोळीबाराची घटना घडून शहरात खळबळ माजली आहे. शुक्रवार दि. २८ रोजी परळीतील विद्यानगर परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने घरातच गोळीबार केला.

   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानगर भागात राहणाऱ्या राहुल अरुणराव टाक या इसमाने आपल्या राहत्या घरात अवैध अग्निशस्त्रातून तब्बल सात राऊंड फायर केले. घटनास्थळावरून पोलिसांना रिव्हॉल्वरच्या सात रिकाम्या कारतुसांच्या खाली, लाकडी मुठीचे दोन तुकडे आणि पांढऱ्या धातूचा तुकडा आढळून आला आहे. गोळीबार करण्याचे कारण मात्र समोर आले नसून पोलिसांच तपास घेत आहेत.

घटना समजताच परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरून गु.र.न. २९६/२०२५ नुसार कलम ३/२५, २७(१) भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत राहुल अरुणराव टाक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 परळीतील सलग गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button