ब्रेकिंग न्यूज

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाणी शिरले !

पोलीस ठाण्याचे कामकाज ठप्प,साहित्य पाण्याखाली.

बीड : गेल्या पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असून बीड शहरालाही याचा मोठा फटका बसला आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी थेट पोलीस ठाण्यात शिरल्याने पोलिसांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

बार्शी रोडवरील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा पक्ष अंमलदार कक्ष, मागील खोल्या तसेच इतर भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे ठाण्यातील महत्त्वाचे दस्तऐवज, नोंदी व इतर वस्तूंना नुकसान झाले आहे. पोलीस ठाण्यातील पाणी काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत असून, पोलिसांना कामकाज सुरळीत ठेवणे अवघड झाले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठाण्याची पाहणी करून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मात्र, पावसाचे प्रमाण लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, नागरिकांसोबतच पोलीस दलही पावसामुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तात्पुरते स्थलांतर सुभाष रोडवरील वाहतूक शाखा कार्यालयात करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील पावसाळापूर्व नियोजनाचा अभाव, जलनिस्सारणाची अकार्यक्षमता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे बीडकरांना दरवर्षी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. यंदा मात्र परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाच काम करणे कठीण झाले आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button