मांजरसुंबा घाटात ऑइल घेऊन जाणारा टँकर पलटी.
ऑइल रस्त्यावर सांडल्याने अनेक वाहने घसरली.

बीड, दि. १३ (प्रतिनिधी): तालुक्यातील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी सायंकाळी ऑईल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि त्यातील ऑईल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरले. त्यामुळे रस्ता अतिशय घसरडा बनल्याने अंदाजे २० ते २५ दुचाकीस्वार घसरून पडल्याची माहिती मिळाली.
अपघातानंतर काही काळ घाटातील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर सांडलेले ऑईल हटविण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील महिन्यातही याच घाटात ऑईल टँकरला अपघात होऊन मोठी आग लागली होती. त्या वेळी जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे या घाटात सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.










