धांडे नगर : नाल्यात व्हॅन चालक तोल जाऊन पडला !
जीवितहानी झाल्यावरच अर्धवट नाली कामापूर्ण करणार का?महिन्यातली अपघाताची तिसरी घटना.

बीड (प्रतिनिधी)बार्शी रोडवरील शिवाजी धांडे नगर परिसरात नाल्याचे काम संथ गतीने चालू असल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दोन, चारचाकी व ट्रक या नाल्यात पडल्याची प्रकरणे समोर आली आहेत. काम पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, गुत्तेदाराला एखाद्याचा जीव गेल्यानंतरच जाग येईल का, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास पावसाची हलकी सर सुरू असताना ATM व्हॅन चालक नाल्याजवळून जात असताना त्याचा तोल गेला. त्याची पँट नाल्यावरील लोखंडी गजात अडकल्याने तो मोठ्या नाल्यात पडला व त्याला दुखापत झाली.यामध्ये तो थोडक्यात बचावला या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.वारंवार होत असलेल्या अपघाताना गुत्तेदार का लोकप्रतिनिधी जबाबदार?असा सवाल नगरीक विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने एटीएम व्हॅन उभी करून नाल्यालगत उभे असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट नाल्यात कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.ATM चालकाची चौकशी देखील करण्यात यावी.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या नाल्यावर संरक्षणासाठी काठडे नसल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे. चालक ज्या ठिकाणी पडला, तेथील उभे असलेले लोखंडी गज शरीरात घुसले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
विशेष म्हणजे, मागील महिन्यात याच नाल्यात एक चारचाकी वाहन कोसळले होते. त्यावेळी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढावे लागले होते. तसेच, चालू महिन्यात या ठिकाणी घडलेली ही तिसरी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी प्रशासनावर व स्थानिक लोकप्रतिनिधीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नाल्यावर तातडीने काम पूर्ण करुन मजबूत संरक्षण भिंत किंवा काठडे उभारून सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.







