कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या.
जबरी चोरी व घरफोडीचे दोन गुन्हे उघड; चोरीचा मुद्देमाल जप्त.

बीड(प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यात कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी राजेंद्र अभिमान नागरे (वय ४१, रा. थेरला, ता. पाटोदा) हे बीडहून आपल्या गावी मोटारसायकलने जात असताना रोहतवाडी शिवारात तीन अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली तसेच कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी नागरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
याच दिवशी आरोपींनी थेरला फाट्याजवळील संतकृपा चहापान केंद्र व सिताबाई महादेव सोनवणे यांच्या घरात घरफोडी करून टीव्ही, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. या प्रकरणीही पाटोदा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण तसेच तांत्रिक तपास केला. पोलीस अंमलदार बाळू सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान माऊली नामदेव पवार (वय २६), मयूर ऊर्फ ओमकार नितीन भोसले (वय २२) आणि आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय १९, सर्व रा. इंदापूर, जि. पुणे) यांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने इंदापूर येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/बाळु सानप, पोह/अर्जुन यादव, पोह/राहुल शिंदे, पोअ/ अशफाक सय्यद, पोअ/मनोज परजणे, पोअ/अश्वीन सुरवसे, व चापोह / नितीन वडमारे यांनी केली आहे.











