दहा हजारांची लाच घेताना पोलीस एसीबीच्या जाळ्यात.
नोटीस बजावण्यासाठी मागितली लाच;जालना एसीबीची बीड शहरात कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली असून, जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी बीड शहर पोलीस ठाण्यात सापळा रचून एका पोलीस कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
माहितीनुसार, फिर्यादीच्या कामाशी संबंधित असलेल्या भारतीय चलनक्षम लिखत अधिनियम (एन.आय. ॲक्ट) कलम १३८ अंतर्गत नोटीस बजावण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.
या कारवाईदरम्यान पोलीस अंमलदार सुशेन प्रकाश उगले याला मागितलेली रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शहर पोलीस ठाणे परिसरात झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, जालना एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. दरम्यान, बीड जिल्ह्यात वारंवार उघडकीस येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे शासकीय यंत्रणेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







