दिवसाढवळ्या बीडमध्ये पुन्हा चैन स्नॅचिंग.
डॉक्टरांच्या गळ्यातील २.६० लाखांची सोन्याची चैन लंपास.चेन स्नॅचिंग करणारी टोळी सक्रिय?

बीड (प्रतिनिधी) : बीड शहर व जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील गुरुकुल शाळेसमोर भरदिवसा एका डॉक्टरांच्या गळ्यातील साडेसहा तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी अजित तुकाराम जाधव (वय ४४, व्यवसाय डॉक्टर, रा. राजीव नगर, पोलीस मुख्यालय शेजारी, धानोरा रोड, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक २२५/२०२६, कलम ३०४(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी दुपारी जालना रोडवरील असलेल्या गुरुकुल इंग्लिश स्कूल समोर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अज्ञात तिघांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकून घेउन पळ काढला. सोन्याची चैन साडेसहा तोळ्यांची असून अंदाजे किंमत २ लाख ६० हजार रुपये असल्याची तक्रार दिली दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकात वातावर भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, बीड शहर तसेच जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







