माजलगाव-तेलगाव रस्त्यावरील भेगांनी घेतला आणखी एक बळी.
रस्त्यावरील भेगा मध्ये दुचाकीचे टायर अडकून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू.

माजलगाव, दि. १८ (प्रतिनिधी): माजलगाव-तेलगाव सिमेंट रस्त्यावरील धोकादायक भेगांनी आणखी एका निष्पाप महिलेचा जीव घेतला आहे. बुधवारी रात्री लहामेवाडीजवळ रस्त्यावरील खोल भेगांमध्ये मोटरसायकलचे टायर अडकल्याने झालेल्या भीषण अपघातात राजेवाडी येथील मनीषा नामदेव थेटे (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा थेटे या आपल्या पतींसोबत पुतण्याच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी माजलगाव येथे आल्या होत्या. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही मोटरसायकलवरून राजेवाडीकडे परतत असताना लहामेवाडीजवळील रस्त्यावर असलेल्या मोठ्या भेगांमध्ये मोटरसायकलचे पुढील टायर अचानक अडकले. त्यामुळे मोटरसायकलवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर जोरात कोसळले.
या अपघातात मनीषा थेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हात-पायांनाही जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमा गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, माजलगाव-तेलगाव मार्गावरील भेगा आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर आतापर्यंत ४० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शासन आणखी किती बळी या रस्त्यावर घेणार तसेच संबंधित गुत्तेगारावर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी नागरिक करत आहेत.या घटनेनंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, धोकादायक भेगा बुजवाव्यात आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.











