
बीड, दि. 17 (प्रतिनिधी) पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर परिसरात कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेला अटक केली असून तिच्याकडून 6.074 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत 36 हजार 444 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर येथील कमलबाई राधाकिसन खंडागळे (वय 70) या झाडू बनविण्याच्या व्यवसायाच्या आडून गांजा विक्री करत असल्याचे समोर आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी झाडू बनविण्यासाठी ठेवलेल्या शिंदळीच्या खाली लपवून ठेवलेला 6.074 किलो गांजा आढळून आला. दोन पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून गांजा ताब्यात घेण्यात आला व संबंधित महिलेला अटक करण्यात आली.
याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2026 नोंद करण्यात आला असून तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, पोहेकॉ सुभाष मोठे, नितीन राठोड, पोलीस हवालदार उगले, माने, महिला पोलीस हवालदार रंजना सांगळे, रेश्मा जाधव तसेच पोलीस अंमलदार बहीर, विष्णु गुजर,औदुंबर गिरी आणि पांडुरंग परजने यांनी सहभाग घेतला.







