तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक जेरबंद.
भूसंपादन घोटाळा प्रकरणाला वेग;जिल्हाधिकाऱ्यांनाच अटक झाल्याने खळबळ

बीड, दि. ७ — बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनींचे वाढीव मूल्यांकन करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच दलालांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी एम. व्यंकटराम यांच्याकडे देण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अविनाश पाठक यांना लातूर येथे ताब्यात घेतले.
आज त्यांना लातूर न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार असून त्यानंतर बीड येथे आणून न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




