एकाच आठवड्यात तीन बालविवाह रोखून नवरदेवासह सात जणांवर गुन्हे दखल.
अल्पवयीन मुलींची सुटका;AHTU पथकाची धडक कारवाई.

बीड : जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) पथकाने प्रभावी कारवाई करत एका आठवड्यात तीन बालविवाह उधळून लावत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहीफळ (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना मिळाली. त्यानुसार AHTU पथकाने घटनास्थळी धाड टाकत लग्नमंडपात सापळा रचला. वेषांतर करून महिला अंमलदारांनी मुलीला ताब्यात घेतले, तर पुरुष अंमलदारांनी नवरदेवास पकडले. त्यानंतर मंडपातील उपस्थितांना बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिचा विवाह इरफान बेग अन्सार बेग (वय २४, रा. माळपुरी) याच्यासोबत लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मुलगी, तिचे पालक, नवरदेव व त्याचे पालक तसेच इतर नातेवाईकांना ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण १० आरोपींसह १५ ते २० वऱ्हाडी मंडळींचाही समावेश आहे.
दरम्यान, याच दिवशी जोला (ता. केज) येथेही अशाच प्रकारच्या बालविवाहाची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ धाव घेत मुलगी व तिच्या पालकांना ताब्यात घेतले. नवरदेव श्रीकांत जाधव व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी दि. १८ एप्रिल रोजी सोनगाव (ता. जि. बीड) येथे १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती.
अशा प्रकारे एका हप्त्यात तीन बालविवाह प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, मागील चार महिन्यांत AHTU बीडने एकूण सात प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत PSI पल्लवी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, उषा चौरे, पोलीस हवालदार शोभा जाधव, प्रदीप येवले, अशोक शिंदे तसेच चालक भाऊसाहेब जाधव व अक्षय जाधव यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात बालविवाह विषयी माहिती द्यावी असे आवाहन PSI पल्लवी जाधव यांनी केले आहे.





