महावितरणचा भोंगळ कारभार;तुटलेल्या तारा घराजवळ,मुख्य रस्त्यावर पडल्या.
जीवितहानी झाल्यास महावितरण जबाबदार:मायाताई मिसळे

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या वादळी वातावरणात नाळवंडी नाका,एकता नगर परिसरात विद्युत तारा तुटून थेट रस्त्यावर कोसळल्या. काही तारा एका घराजवळही पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तारा तुटल्यामुळे बीड बीड भागात रात्रीपासून अंधारात आहे, सकाळी देखील कर्मचारी आले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
घटनेनंतर अनेक तास उलटूनही महावितरणचे एकही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती संबंधित लाईनमन व अधिकाऱ्यांना देऊनही कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप रिपाई जिल्हाध्यक्ष मायाताई मिसळे यांनी केला आहे.
या ठिकाणी या तारा पडल्या आहेत त्याच्या बाजूला या परिसरात खाजगी क्लासेस असून विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुटलेल्या तारांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिक आणि मुक्या प्राण्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. “जर या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर राहील,” असा इशाराही मायाताई मिसळे यांनी दिला आहे.
तसेच, संबंधित निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून या भागातील तुटलेल्या विद्युत तारा त्वरित दुरुस्त कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या भागातील अनेक उघड्या डीपी व लोंबणाऱ्या तारा असून दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील त्या दुरुस्त करण्यात आल्या नसल्याने मुके प्राणी,विद्यार्थी व नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे उघड्या डीपी दुरुस्त कराव्यात अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मायाताई मिसळे यांनी दिला आहे.






