ब्रेकिंग न्यूज

शेतात अफूची लागवड ५ लाखांचा मुद्देमाल जप्त;शेतकऱ्यावर गुन्हा.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपये किंमतीची २० किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली असून एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री सुमारे ९.३० वाजता आष्टी तालुक्यातील पिंपळा परिसरात छापा टाकला. यावेळी परसराम मोहन जगधने (रा. पिंपळा, ता. आष्टी, जि. बीड) हा त्याच्या शेतातील कांद्याच्या पिकामध्ये अफूची बेकायदेशीर लागवड करताना आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून बोंडे व फुले असलेली अंदाजे २० किलो अफूची झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२०२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नविनत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी हानपुडे पाटील व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश विघ्ने, पोलिस हवालदार अशोक दुबाले, गोविंद राख, बबन सलगर, सुनील राठोड तसेच अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दरम्यान, बीड जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्री, उत्पादन, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास एनडीपीएस कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांक ९२७०२४३२०० वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button