अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कोल्हापूरहून सुटका व हरवलेली महिला कर्नाटकात सापडली.
DYSP पूजा पवार यांनी केले बीड शहर पोलिसांच्या पथकाचे कौतुक.

बीड (प्रतिनिधी) बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची कोल्हापूर येथून सुखरूप सुटका करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपलब्ध तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे व समन्वयित तपासाच्या आधारे पोलिस पथकाने कोल्हापूर येथे जाऊन अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. सुटकेनंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास चालू आहे.
अशा प्रकारच्या गंभीर घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देणे व कठोर कारवाई करणे यासंदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्हाभर स्पष्ट व कडक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी बीड शहर पोलीस दलाकडून करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने ही यशस्वी कारवाई पार पडली आहे.
या संपूर्ण तपासात पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय राठोड व सुरेश तांबे यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. तसेच पोलीस अंमलदार सुशेन उगले यांनी कर्तव्यदक्षतेने कर्नाटक राज्यात जाऊन एका हरवलेल्या महिलेचा शोध घेत तिला सुखरूपपणे शोधून तिच्या पतीच्या ताब्यात दिले. या मानवीय व प्रशंसनीय कामगिरीमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या दोन्ही यशस्वी कारवायांमुळे तक्रारदार व पीडितांच्या नातेवाईकांकडून बीड शहर पोलिसांचे मनापासून कौतुक करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांनी आपल्या कार्यालयात पोलिस पथकास बोलावून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले तसेच संबंधित अंमलदारांचा सत्कार केला. या कारवाईदरम्यान अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
अल्पवयीन मुली, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत बीड शहर पोलीस सदैव कटिबद्ध असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जात असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








