तहसील परिसरात एजंटगिरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा – आमदार सुरेश धस
आढावा बैठकीत आ.धस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.

पाटोदा(प्रतिनिधी महेश बेदरे )कामाच्या नावाखाली “तुझे काम करून देतो” असे सांगत नागरिकांकडून चिरीमिरी घेऊन तहसील परिसरात वावरणाऱ्या एजंटांवर तात्काळ चाप बसवा. असे प्रकार घडले किंवा समोर आले तर संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करा, असा कडक इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला.
मंगळवारी पाटोदा तहसील कार्यालयात झालेल्या तालुकास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. तहसील कार्यालयातील एजंटगिरी, दलाली व आर्थिक गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांची कामे अडत असल्याने यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार सुरेश धस यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. सौर कृषी पंपांचे रखडलेले वितरण, कमी विद्युत दाब, ट्रान्सफॉर्मर अभाव आणि नवीन वीज कनेक्शनमधील दिरंगाई तात्काळ दूर करण्याचे आदेश देत कंत्राटदारांचे लाड बंद करण्याचा स्पष्ट इशारा दिला.
या आढावा बैठकीस तहसीलदार दत्तात्रय निलावाड, उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख यांच्यासह महसूल, महावितरण, पंचायत समिती व इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
“काम करा, अन्यथा कारवाई अटळ आहे,” असा ठाम संदेश आमदार सुरेश धस यांनी दिला.








