ब्रेकिंग न्यूज

दोन दिवसात खुनातील आरोपी जेरबंद.

खुनाचा उलगडा चार आरोपी अटकेत;स्थानिक गुन्हे शाखेला यश.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात आढळलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या प्रेताची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना यश आले आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

      दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळगाव (ता. अंबाजोगाई) शिवारातील मंचक पंढरी डवारे यांच्या गायरान शेतात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पालथे अवस्थेत आढळून आले. बर्दापूर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखाना, अंबाजोगाई येथे पाठवला. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यावरून बर्दापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 299/2025, कलम 103 (1) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला. सखोल चौकशीत मृत व्यक्तीची ओळख पटली. मृताचे नाव स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ (वय 30, रा. चक्रे गल्ली, रेणापुर, जि. लातूर) असे आहे.

त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खालील चार आरोपींना 20 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले 1. गोरोबा मधूकर डावरे (वय 45, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) – मुख्य आरोपी2. संतोष लिंबाजी मांदळे (वय 34, रा. बाजीराव चौक, इंडियानगर, लातूर)3. किशोर गोरोबा सोनवणे (वय 29, रा. माताजीनगर, कव्वा नाका, बसवेश्वर चौक, लातूर)4. अमोल विनायक चव्हाण (वय 26, रा. दुर्गा तांडा, ता. कंधार, जि. नांदेड; सध्या— एस.टी. क्वार्टर, जुना रेणापुर नाका, लातूर)

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्निल हा मुख्य आरोपी गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू व त्याच्या पत्नीच्या निधनानंतर गोरोबा डावरे यांनी स्वप्निल व त्याचा भाऊ बबलू यांची पालक म्हणून काळजी घेतली होती. स्वप्निलचे लग्नही त्यांनीच लावून दिले होते. मात्र लग्नानंतर स्वप्निल दारूच्या नशेत पत्नी व गोरोबा डावरे यांना वारंवार त्रास देत होता. घरगुती वादातून स्वप्निलने गोरोबा यांच्यावर धावून जाण्याचाही प्रकार घडला होता. या रागातून गोरोबा डावरे यांनी सहआरोपींच्या मदतीने स्वप्निलला रेणापुरहून जवळगाव येथे आणून जबर मारहाण करत गळा आवळून खून केल्याची कबुली चौकशीत आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील चारही आरोपी अटकेत असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर कांबळे (पो.स्टे. बर्दापूर) करत आहेत.

ही कारवाई नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, आणि शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पो.उपनि. सुशांत सुतळे, पो.ह. मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, पो.अं. सचिन आंढळे, विकी सुरवसे, चालक पो.ह. अतुल हराळे तसेच बर्दापूर पोलीस स्टेशनचे पो.ह. शरद कदम व पो.अं. कडुबा म्हेत्रे यांच्या संयुक्त पथकाने केली.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button