ब्रेकिंग न्यूज

गेवराईत विनापरवाना वाळू उपसा-वाहतूक जोरात.

महसूल व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह;लाखोचा महसूल पाण्यात.

बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात वाळू उपसा व वाहतुकीवर निर्बंध असतानाही गेवराई तालुक्यातील तपे निमगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या परिसरात तब्बल पाच मशीनच्या साहाय्याने रात्रंदिवस वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक मशीन दिवसाला सुमारे 50 ते 60 ब्रास, तर रात्रंदिवस मिळून 100 ते 120 ब्रास वाळूचे उत्खनन करत आहे. त्यानुसार पाच मशीनद्वारे दररोज अंदाजे 500 ते 600 ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे.

या वाळूच्या वाहतुकीसाठी 20 ते 25 ट्रॅक्टरचा वापर केला जात असून, वाळू माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील तपे निमगाव चौकात मोठ्या प्रमाणात साठवली जात असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर लोडरच्या साहाय्याने टिप्परमध्ये भरून विविध ठिकाणी पाठवली जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असताना देखील हा प्रकार सुरू असल्याने महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, वाळू लिलावाची मुदत संपल्यानंतरही हा उपसा नेमका कोणाच्या आदेशाने सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास शासनाच्या महसुलाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button