
बीडदि.५ (प्रतिनिधी):- कपिलधार देवस्थान या ठिकाणी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांच्याही आई-वडिलांसह, नातेवाईक आणि ५० ते ६० वऱ्हाडी यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी फोनद्वारे माहिती दिली की, आज दुपारी १२ वाजता कपिलधार देवस्थान (ता. बीड) येथे एका १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे. त्यावरून, पोउपनि. पल्लवी जाधव, तत्वशील कांबळे हे सहकाऱ्यांसह कपिलधार देवस्थान येथे दाखल झाले. तेथे दोन, तीन विवाह सुरू होते आणि गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांची टीम पहिल्या हॉलमध्ये दाखल झाली. तेथे गेल्यावर पो. उप नि. पल्लवी जाधव यांनी एका महिलेला नवरी मुलीचे नाव विचारले असता तिने मुलीचे नाव चुकीचे सांगितले म्हणून टीम तेथून बाहेर पडणार तोच मुलीचे आडनाव विचारले तर ते बरोबर सांगितले. त्यामुळे मुलीला ताब्यात घ्यायला टीम जाणार तोच वऱ्हाडी मंडळीला पोलीस असल्याचा संशय असल्याने नवरदेव लग्न मंडपातून पळाला.










