ब्रेकिंग न्यूज

लाच प्रकरणी तहसीलदार मुंडेंचे निलंबन;महसूल विभागात खळबळ.

मुंडे ACB च्या जाळ्यात अडकताच तहसील परिसरात नागरिकांनी फोडले होते फटाके.

बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयातील वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक झालेल्या परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडेला विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मागील महिन्यात एपत प्रमाणपत्र देण्यासाठी मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुंडे यांना रंगेहाथ पकडले.

कारवाईदरम्यान त्यांच्या घराची झडती घेतली असता ५५ हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १३ तोळे सोने आढळून आले. या प्रकरणानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता.

दरम्यान, १३ मार्च रोजी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मुंडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन काळात त्यांची नियुक्ती जालना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, तहसीलदार मुंडे हे गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरत होते. एसीबीच्या कारवाईनंतर परळी तहसील परिसरात काही ठिकाणी फटाके फोडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात वरिष्ठांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या.

मुंडे यांच्या निलंबनामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button