

*धारूर घाटात ट्रकचा भीषण अपघात; १०० फूट दरीत कोसळला, चालक थोडक्यात बचावला*
अंबाजोगाई- प्रतिनिधी :-
धारूर घाटात सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. हैदराबादहून शिर्डीकडे फरशी (टाइल्स) घेऊन जाणारा ट्रक सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने चालकाने वेळेत उडी मारल्यामुळे तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर केज येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून फरशी घेऊन निघालेला ट्रक धारूर घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने रस्त्यावरील कठडे तोडून थेट दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळल्यानंतर उतारावर अडकून थांबला.
अपघाताची चाहूल लागताच चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारून आपला जीव वाचवला. ही घटना सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, धारूर घाटातील हा धोकादायक वळण अपघातप्रवण ठरत असून मागील वर्षभरात या ठिकाणी ट्रक दरीत कोसळण्याची ही सातवी घटना आहे. वारंवार अपघात होत असल्याने हा घाट ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. जड वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेला हा घाट तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे



