मध्यरात्रीतुन उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा.
निखिल मस्के यांनी स्वखर्चाने उभारला पुतळा;शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरालगत असलेल्या पालवण गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. युवक निखिल मस्के यांनी स्वखर्चाने महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिवप्रेमींनी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर पुतळ्याची स्थापना केली.
मागील तीन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. सुमारे २० शिवशंभू भक्तांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत पुतळा उभारणीची रणनिती आखली. रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत पुतळा बसविण्याचे काम पार पडले. या कार्यात ओंकार डुकरे, अमोल शेळके, अभिषेक जठाळ, भगवान मस्के, अशोक मस्के, युवराज मस्के, विजय मस्के, विकास मस्के, आदेश महागोविंद, बाबासाहेब सातपुते, समाधान मस्के, गिरी, सक्षम मस्के, रमेश, योगेश घोलप आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.
पालवण गावात महाराजांचा भव्य पुतळा असावा, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र यासाठी कोणी ठोस पुढाकार घेतला नव्हता. अखेर निखिल मस्के पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गनिमी काव्याच्या धर्तीवर जयंतीच्या पूर्वसंध्येला हा पुतळा उभारून शिवभक्तांची इच्छा पूर्ण केली.
या उपक्रमामुळे पालवण गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून शिवप्रेमींनी निखिल मस्के व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.










