नेकनूर पोलिसांचा प्रताप,बेपत्ता मुलीच्या नातेवाईकाला पोलीस ठाण्यात मारहाण
मुलीच्या नातेवाईकांनाच मारहाण,पत्रकारांनाही अरेरावी.

बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील धावज्याचीवाडी येथील 17 वर्षीय तरुणी 1 डिसेंबर 2025 पासुन बेपत्ता आहे. यासंदर्भातली एक तक्रार नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे. त्याबाबतच्या तपासाची माहिती घेण्यासाठी आज सायंकाळच्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलीचा शोध का लागत नाही? असा जाब विचारल्याने पोलिसांनी मनात राग धरून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान नातेवाईक बिभीषण भोसले यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. यादरम्यान पत्रकारांनी विचारपूस केली असता आणि व्हिडिओ काढत असताना अरेरावी करत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा एका तरुणाला धमकी देतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
दरम्यान पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पोलीस स्टेशन आवारात सदरील नातेवाईकांनी गोंधळ घातला यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मारहाण केल्याच्या आरोपांवर मात्र पोलिसांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.










