अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार.
पाडळशिंगी टोल नाक्याजवळ जीव गेला;मदतीला कोणीच आले नाही.

बीड(प्रतिनिधी) धुळे–सोलापूर महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने जीव घेतला असून मदतीअभावी संतापाची लाट उसळली आहे. पाडशिंगी टोल नाक्याजवळ घडलेल्या या घटनेने टोल प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
धुळे–सोलापूर महामार्गावरील पाडशिंगी टोल नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की, तो इसम जागेवरच ठार झाला.
घटनास्थळ टोल नाक्याच्या अगदी जवळ असतानाही तेथील कर्मचाऱ्यांकडून, प्रवाशाकडून किंवा स्थानिक रहिवाशी कोणतीही तत्पर मदत मिळाली नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींकडून केला जात आहे. अपघातानंतर बराच वेळ जखमी व्यक्ती रस्त्यावर पडून होती, मात्र उपचारासाठी पुढाकार घेतला गेला नाही, असे सांगितले जात आहे. महामार्गावर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सेवाही वेळेत पोहोचली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख नसल्याचे देखील माहिती मिळत आहे
दरम्यान, बीड येथील स्व. अमोल भैया गलधरी युवा मंचाच्या कार्यकर्ते सुदर्शन काळे यांनी घटनास्थळी धाव घेत व घडलेल्या घटना बाबत संताप व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करत परिस्थिती दाखवून दिली. या लाईव्हमधून टोल कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी हालचाल केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
टोल नाक्यावरून दररोज लाखो रुपयांची वसुली केली जाते; मात्र आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना मदत देण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अपघातानंतर तत्काळ मदत मिळाली असती तर जीव वाचला असता का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










