पो.नि.अशोक मुदिराज यांची तडकाफडकी बदली.
तीन महिन्यातच बदली केल्याने शहरात चर्चेला उधाण.

बीड (प्रतिनिधी):बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांची आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची बदली थेट पोलीस कंट्रोल रूम येथे करण्यात आल्याने पोलीस दलासह बीड शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी बीड पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली होती. मात्र, केवळ तीन महिन्यांच्या आतच पो.नि. अशोक मुदिराज यांची बदली करण्यात आल्याने या निर्णयामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बीड ग्रामीण पोलीस ठाणे वादग्रस्त ठरत असून, या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस ठाण्यातीलच काही अधिकारी या अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याची माहितीही समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर पो.नि. अशोक मुदिराज यांची तडकाफडकी बदली ही कारवाई आहे की प्रशासकीय निर्णय, याबाबत सध्या तरी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेमुळे बीड शहरात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.










