ब्रेकिंग न्यूज

३ कोटी ८६ लाखांचा गंडा घालणारा पोलिसांच्या ताब्यात.

एमडी अ‍ॅडमिशनच्या नावाखाली देशभर फसवणूक करणारावर केज DYSP यांची कारवाई.

केज (प्रतिनिधी) — वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात (एमडी) मॅनेजमेंट कोट्यात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून तब्बल ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, केज यांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई कराड (जि. सातारा) येथे आज १३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.

पोलीस ठाणे धारूर येथे दाखल गु. र. नं. ४५३/२०२५ (कलम ३१८(४) बी.एन.एस.एस.) अन्वये हा गुन्हा नोंद असून, तपास श्री. वेंकटराम (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, केज स्वतः करत आहेत.

फसवणुकीची हकीकत :

फिर्यादी अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७, वैद्यकीय अधिकारी, रा. सोनीमोहा, ता. धारूर) हे बारामती येथे कार्यरत असताना फेसबुकवरील एस.के. एज्युकेशन या अकाउंटद्वारे आरोपी सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) याच्याशी संपर्कात आले. आरोपीने जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा येथे एमडी (इमर्जन्सी/मेडिसिन) प्रवेश मॅनेजमेंट कोट्यातून करून देतो, असे सांगत ९९ लाखांची फी ६५ लाखांत करून देण्याचे आमिष दाखवले.

दिनांक २०.०९.२०२४ ते २९.०९.२०२४ दरम्यान आरोपीने प्रवेश देतो असे सांगून ८ लाख रुपये (रोख व ऑनलाईन) उकळले. मात्र कोणत्याही यादीत फिर्यादीचे नाव आले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीने टाळाटाळ करत नकार दिल्याने फसवणूक उघडकीस आली.

देशभर गुन्ह्यांची साखळी :

तपासात उघड झाले की आरोपीविरुद्ध नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली, गुजरात, पंजाब आदी ठिकाणी १५ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांतून आरोपीने एकूण ३,८६,६१,०००/- रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिताफीने अटक:

गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व टेक्निकल अ‍ॅनालिसिस सेल, बीड यांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून कराड येथे अटक करण्यात आली. सध्या आरोपीकडून आणखी फसवणुकीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी:

ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक नवनीत कवत सो. व मा. अपर पोलिस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात श्री. वेंकटराम (भा.पो.से.) सहा. पोलीस अधीक्षक, पोउपनि जावेद कराडकर, ग्रे. पोउपनि अमीर इनामदार, पोना/१०३५ मंदे यांचा समावेश होता.

एमडी अ‍ॅडमिशनच्या नावाखाली सुरू असलेल्या दलाली व फसवणुकीविरोधात पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button