धारदार कोयत्यासह सराईत गुन्हेगार अटकेत.
बीड शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

बीड (प्रतिनिधी) बीड शहर पोलिसांच्या वेळेवर आणि सतर्क कारवाईमुळे शहरात होऊ शकणारा मोठा अनर्थ टळल्याची घटना ११ जानेवारी २०२६ रोजी घडली. बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील माळी वेस चौक परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेली स्कार्पिओ गाडी तपासणीदरम्यान धारदार, घातक कोयता आढळून आल्याने एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे हे त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांच्यासह रात्रगस्त घालत असताना माळी वेस चौक येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमार पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ (क्रमांक एम.एच. १७ बीई ५००७) संशयास्पद अवस्थेत उभी असलेली दिसून आली. पोलिसांनी गाडीत बसलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय पांडुरंग बहिर (वय २७, रा. नवघन राजुरी, ता. व जि. बीड) असे सांगितले. मात्र तो त्या ठिकाणी का थांबला होता याबाबत समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे व पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान यांनी गाडीची सखोल तपासणी केली असता, स्कार्पिओच्या मधल्या सीटखाली एक लोखंडी पातीचा धारदार व घातक कोयता आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार कोयता व पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता,अटक करण्यात आलेला संजय बहिर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन, पिंपळनेर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, रात्री घरफोडी करणे, चोरी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे, पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार बबन जाधव करत आहेत.
बीड शहर पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात घडू शकणारी गंभीर घटना टळली असून, संजय बहिर याचे काही तरुणांसोबत भांडण झाली होती, त्यामुळे तो त्यांना मारण्यासाठी शोधत माळवेस येथे भांडण करण्यासाठी आला असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







