बीडमध्ये भरदिवसा चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरांना,गुन्हेगारांना मोकळे रान.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानकात देखील खिसेकापू व प्रवाशांच्या गळ्यातील सोने लंपास झाले होते यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका,गुटखा,दारू,चक्री जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक सुटल्याची चर्चा शहरात होत आहे. यामुळे शिवाजीनगर डीबी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील महिन्यात बार्शी रोडवरील घोलप क्लासेस समोर एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली होती. त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच पुन्हा एकदा भरदिवसा चैन स्नॅचिंगची घटना घडली आहे. जालना रोडवर घोडके हॉस्पिटलसमोर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील गंठण ओढून पळ काढल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
रविवारी दुपारी ज्योती समीर शिंदे (शेलार) या जालना रोडने शांताई हॉटेलच्या बाजूला असलेल्या रस्त्याने पायी घरी जात असताना, घोडके हॉस्पिटलसमोर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किंमतीची मिनी गंठण जबरदस्तीने ओढून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी ज्योती शिंदे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, शहरात मागील काही दिवसांपासून भरदिवसा घडणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







