ब्रेकिंग न्यूज

वाळू माफियांवर पोलिसांचा धडक कारवाईचा धडाका;३०लाखांचा हायवा जप्त.

API सचिन इंगळे ॲक्शन मोडवर; तीन आठवड्यात तिसरी मोठी कारवाई.

 

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू घाटांच्या लिलावाच्या पार्श्वभूमीवरही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत असताना, चकलांबा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी धडक कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.

दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४० वाजण्याच्या सुमारास गायकवाड जळगाव ते मालेगाव या कच्च्या रस्त्यावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली. या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा पिवळ्या रंगाचा हायवा (क्र. MH 14 GH 9108) ताब्यात घेण्यात आला.

या हायवामध्ये अवैधरित्या वाळू भरलेली आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत अंदाजे ₹३० लाख असून, त्यामधील वाळूची किंमत सुमारे ₹३० हजार आहे. अशा प्रकारे एकूण ₹३० लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी गोकुळ राजेंद्र रोकडे (वय २६, रा. अर्धापुरी, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने कोणताही अधिकृत परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध वाळू वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या संदर्भात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी घोंगडे, थापडे, इंगोले यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक गुजर करत आहेत.

विशेष म्हणजे, सपोनि सचिन इंगळे यांनी चकलांबा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यावर कारवायाचा धडाका लावला असून तीन आठवड्यांत ही तिसरी मोठी कारवाई आहे, त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची चर्चा परिसरात सुरू असून अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button