ब्रेकिंग न्यूज

मोबाईल व रोख रक्कम हिसकावणारे दोन आरोपी जेरबंद.

API पुजारी यांची तत्पर कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील रस्त्यावर मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना पेठ बीड पोलिसांनी अवघ्या एका तासात ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल सुरेश शहागडकर (वय 35, रा. नाळवंडी रोड, पेठ बीड) यांनी तक्रार दिली. 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास ते सहयोगनगर येथील समर्थ जनरल स्टोअर्स दुकान बंद करून पायी घरी जात होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा स्टॉपजवळ आले असता मच्छी मार्केट रोडकडून विना क्रमांकाच्या पांढऱ्या-पिस्ता रंगाच्या अॅक्सेस स्कुटीवर दोन अनोळखी इसम आले.

त्यापैकी मागे बसलेला इसम खाली उतरून फिर्यादीच्या खिशात हात घालून मोबाईल फोन, चारचाकी वाहनाची चावी आणि सुमारे ५ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली व साथीदारासह स्कुटीवरून पळ काढला.

या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 57/2026 कलम 304(2), 3(5) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पुजारी व डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांची माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान विजय धारासिंग सुतार (वय 21, रा. चांदण्याचा वाडा, काळा हनुमान ठाणा, पेठ बीड) आणि आमीर खान अकबर खान पठाण (वय 29, रा. इस्लामपुरा, पेठ बीड) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या एका तासात ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 26 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्सेस स्कुटी जप्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पुजारी पो. सुभाष मोटे,पो. राठोड, पो.भोजे व पथकाने केली. पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button