सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण;आरोपींने केली उज्वल निकम यांना हटवण्याची मागणी.
वेळकाढूपना केला जात आहे;सरकारी वकील व धनंजय देशमुख काय म्हणाले पहा !

बीड (प्रतिनिधी) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष उलटूनही देशमुख कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी आज बीड जिल्हा न्यायालयात सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी प्रारंभीचा युक्तिवाद मांडला. दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली असून, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करत, त्यांना या खटल्यातून बाजूला करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. या अर्जामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या आरोपांना उत्तर देताना विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात जोरदार प्रत्युत्तर दिले. आरोपींचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी त्यांनी न्यायाधीशांकडे केली. याचवेळी, न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन घुलेचे नाव पुकारताच तो अचानक चक्कर येऊन न्यायालयात कोसळला. त्यामुळे काही काळ न्यायालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर सुनावणी काही काळासाठी थांबवण्यात आली. पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय आरोपींच्या अर्जावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख कुटुंबीयांनी मात्र न्याय लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीकडे बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




