ब्रेकिंग न्यूज

अट्टल दुचाकीचोरास ठोकल्या बेड्या.

बीड शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे जाळे उधळले;आठ गाड्या जप्त,आरोपी अटकेत.

 

 

बीड (प्रतिनिधी) — बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अट्टल दुचाकीचोरास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल आठ चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

विशेषतः बीड शासकीय रुग्णालय परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करत बीड शहर पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोठे यश मिळवले आहे.

 सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर (वय २५ वर्षे), रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे आहे.

फायनान्समधील अनुभवातून गुन्हेगारीकडे वाटचाल :

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की आरोपी यापूर्वी एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता. फायनान्सचे हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या जप्त करण्याचे (रीपोझेशन) काम करत असताना त्याला वाहन उचलण्याची सवय व कौशल्य प्राप्त झाले. याच अनुभवाचा गैरवापर करत त्याने मोटरसायकल चोरी करण्यास सुरुवात केली.

चोरी केलेल्या दुचाकी आरोपी पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे. “मी फायनान्स/बँकेत काम करतो”, “या गाड्या हप्ते थकित असल्याने ओढून आणलेल्या आहेत” अशी बतावणी करून तो नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्याने अनेकांनी विश्वास ठेवून या चोरीच्या दुचाकी खरेदी केल्या.

नागरिकांचे दुहेरी नुकसान

पोलिस तपासात सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या. यामुळे संबंधित खरेदीदारांना खरेदी केलेल्या मोटरसायकली गमवाव्या लागल्या तसेच त्या बदल्यात दिलेली रक्कमही बुडाली अशा प्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर वउपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव,पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, इलियास शेख, मंगेश शिंदे, शौकत शेख तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली.

या तपासातून शिवाजीनगर पोलीस ठाणे व बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीचा आणखी गुन्ह्यांमधील सहभाग तपासला जात आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन :

बीड शहर पोलिसांनी नागरिकांना पुढील सूचना केल्या आहेत.

दुचाकी वाहने नेहमी सुरक्षित व सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणीच पार्क करावीत.

वाहन दोन वर्षांपेक्षा जुने असल्यास डबल लॉक, हँडल लॉक व आवश्यकतेनुसार व्हील लॉक वापरावे.

“फायनान्सची गाडी आहे” किंवा “ओढून आणलेली आहे” अशा कारणांवर वाहन खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रांची खातरजमा करावी.

संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

मोटरसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बीड शहर पोलीस कटिबद्ध असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button