
माजलगाव तालुक्यातील ब्रम्हगाव येथील बालासाहेब दासु कांबळे (वय ३६) या ऊसतोड मजुराचा सिंदफना नदीत बुडून मृत्यू झाल्याची हादरवणारी घटना घडली. २ डिसेंबर २०२५ रोजी नदी पार करताना ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यानंतर सलग तीन दिवस एनडीआरएफ पथकासह स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांकडून शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र काहीच निष्पन्न झाले नव्हते.
अखेर ५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास बालासाहेब यांचे प्रेत पाण्यावर फुगून आल्याने नदीकाठाजवळ आढळून आले. नागरिकांनी याची माहिती पोलिस प्रशासनाला दिल्यानंतर पंचनामा करून प्रेताची ओळख पटवण्यात आली.
बालासाहेब कांबळे हे ऊसतोड श्रमासाठी कोपी येथे वास्तव्यास होते. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ऊसतोड बंद असल्याने ते नदी पार करताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या मृत्यूने ब्रम्हगाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणामुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा पुढे आला असून, मजुरांसाठी शासनाने योग्य ती मदत व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







