ब्रेकिंग न्यूज

बार्शी रोडवर दोन तासापासून पुन्हा वाहतूक कोंडी.

रुग्णवाहिकाही अडकली,नागरिकांचा संताप.वाहनांच्या लांबच लांब रांगा.

 

बीड (प्रतिनिधी) – बार्शी रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आज पुन्हा चिघळला असून तब्बल दोन तास रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. या वाहतूक कोंडीमुळे बीड शासकीय रुग्णालय ते तेलगाव नाका चौकापर्यंत शेकडो वाहने या वाहतूक कोंडीत अडकली होती. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडल्याने संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंगल कार्यालयात लग्न समारंभ असल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. बार्शी रोडवरील मंगल कार्यालय–हॉटेल, दवाखाने, लॉज याला पार्किंग सुविधा नसल्याने लग्न समारंभासाठी आलेली वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात आहेत. यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत असून आज परिस्थिती अधिक गंभीर झाली.

लग्नासाठी लाखो रुपये घेणारे मंगल कार्यालय व हॉटेल चालकांना पार्किंगची सुविधा न देताच कार्यक्रम आयोजित करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी कार्यालय किंवा नोकरी आटोपून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिर पासून शासकीय रुग्णालय ते बार्शी नाका तेलगाव नाका चौकापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, घटनास्थळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. कोंडीची माहिती पोलिसांना देण्यात आली असतानाही कर्मचार्‍यांनी दाखल न झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचे निदर्शनास आले.

एरवी बीड शासकीय रुग्णालयासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी वर वाहतूक पोलीस ऑनलाइन दंड आकारत आहेत, परंतु बार्शी रोड,जालना रोड,नगर वरील हॉटेल मंगल कार्यालयासमोरील वाहनांना मात्र सूट दिली जात आहे, बीड शासकीय रुग्णालयात येणारा प्रत्येक जण हा काही ना काही कामानिमित्त नातेवाईकाला भेटण्यासाठी किंवा कुटुंबाला आजारी असल्याने उपचारासाठी,भेटण्यासाठी येत असतो, त्याने बाहेर दुचाकी लावली तर त्याच्या दुचाकी वर ऑनलाईन दंड आकारण्यात येतो. परंतु हाच न्याय सर्व सामान्यांना का नाही?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यावेळी वाहतूक पोलिसांच्या ऑनलाईन दंड आकाराच्या मशीन बंद पडतात की काय? मोठ्यांना श्रीमंतांना सूट व गरिबांची लूट होत असल्याचे चित्र सध्या बीड शहरात पहावयास मिळत आहे.

या परिसरातील मंगल कार्यालये व हॉटेल चालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी तीव्र मागणी स्थानिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहतूक व्यवस्थेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. बार्शी रोडवरील हॉटेल मंगल कार्यालय लॉज दवाखाने याला पार्किंग सुविधा नसल्यानेच वाहतूक कोंडी होत आहे यामुळे पार्किंग सुविधा नसलेल्या मंगल कार्यालय हॉटेल व दवाखाने यांवर कारवाई करून परवाना रद्द करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button