बंदी असताना जनावरांच्या टकरी;अनेक जनावरे जखमी.
पोलिसांकडून कारवाईचा अभाव,बघ्याची भूमिका.जनावरांच्या जीवांशी चाललेला खेळ थांबवा : पशुप्रेमी,पेट शील्ड.

बीड(प्रतिनिधी) बीड राज्यात जनावरांच्या टकरींवर बंदी असतानाही बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कोल्हारवाडी फाट्यावर दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त जनावरांची टकरी लावण्यात आली. या टकरींमध्ये अनेक जनावरे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पशुप्रेमींनी संताप व्यक्त केला.
बीडमध्ये होणाऱ्या पशुच्या(रेड्याच्या) टकरीवर बीड मधील पशुप्रेमी संस्था ‘पेट शिल्ड’ यांनी यापूर्वीच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अशा टकरींवर बंदी आणावी व आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पेट शिल्ड ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून बीड मधील जखमी भटके कुत्रे, जनावरे,पक्ष्याची सेवा करत आहे. अनेक मुख्या प्राण्याचे प्राण देखील पेट शिल्ड मधील युवकांनी वाचवले आहेत.
दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी कोल्हारवाडी परिसरात जनावराच्या टकरी मध्ये सोरट जुगार प्रकरणात कारवाई केली असली तरी जनावरांच्या टकरीबाबत मात्र दुर्लक्ष केल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. रेड्याच्या टकरीची झुंज करून यावर बक्षीस लावले जाते, या टकरीमध्ये अनेक जनावरे जखमी होत असून मुक्या प्राण्यांच्या टकरीवर बक्षीस देण्याची प्रथा कितपत योग्य आहे? असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच या ठिकाणी टकरी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक जमा होत असून, एखादी दुर्घटना झाली तर प्रथमोउपचार म्हणून कोणतीही उपाययोजना आयोजकाकडून करण्यात येत नसल्याने एखादी जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पशुप्रेमी व पेट शिल्ड संस्थेने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा अमानवी प्रथांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.




