आणखी दोन गुंडावर MPDA,हर्सूल कारागृहात रवानगी.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा गुन्हेगारीवर धडक निर्णय.

बीड : बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रशासनाने मोठी कारवाई करत दोन कुख्यात गुन्हेगारांना MPDA (गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारागृहात डांबले आहे. जिल्हाधिकारी विवेक जोन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या दोघांवर कठोर पाऊल उचलले असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,पेठ बीड शहर येथील गुन्हेगार प्रमोद उर्फ गोपी दत्तात्रय घुले (वय २५) यास २७ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर जबर मारहाण, भय निर्माण करणे, बेकायदेशीर टोळ्यांचे नेतृत्व करणे, अवैध धंदे चालविणे अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
तसेच पो.ठाणे शिवाजीनगर बीड येथील दुसरा सराईत गुन्हेगार गणेश उर्फ गण्या शंकर देशमुख याच्यावरही अवैध कृत्यांमध्ये सहभाग, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी टोळ्या चालविणे, जबरदस्तीने पैसे उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल होते. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यालाही MPDA कायद्यांतर्गत अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
- ही दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक त्र्यंबक थोरात, उपविभागीय अधिकारी कृष्णा शिंदे, तसेच संबंधित पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या या संयुक्त कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून, नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे हे ठोस आणि प्रभावी पाऊल असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





