बीडमध्ये पुन्हा खून,आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पावसात रस्ता रोको
आरोपींना अटक होईपर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार व प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

बीड :बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून खुनाचे प्रकार वाढत असून, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे व कायद्याचे भय उरले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या एका तरुणाच्या हत्येने जिल्हा हादरला आहे.
25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पेठ बीड येथील यश देवेंद्र ढाका (वय 22) या तरुणाचा किरकोळ वादातून खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच बीड शहरात एकच खळबळ उडाली.
गंभीर जखमी अवस्थेत यशला बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी यशच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येणार होते. तथापि, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आरोपीचे अटकेसाठी शवविच्छेदन ग्रहासमोरच रस्ता रोको करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा घोषणाबाजी करण्यात आली. वाहनाच्या लाभतला रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सतत घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





