तासभर पावसाने बीड शहरातील मोंढा भागात तळ्याचे स्वरूप पाहा.
नाले साफसफाई अभावी,अतिक्रमणामुळे घरात,गॅरेज मध्ये शिरले पाणी.

बीड(प्रतिनिधी)बीड दिनांक १९ सप्टेंबर शुक्रवार रोजी चार वाजण्याच्या सुमारास बीड शहरावर पुन्हा एकदा पावसाने धडक दिली. केवळ एका तासाच्या जोरदार पावसाने संपूर्ण शहरातील विविध भाग जलमय झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर तळ्याचे स्वरूप निर्माण होऊन वाहनधारक व पादचारी यांची मोठी गैरसोय झाली.
जुना मोंढा भागात, रविराज मंगल कार्यालयासमोर नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला. परिणामी या भागात पाणी साचून रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले. काही दुचाकी पाण्यात बंद पडल्या तर अनेक वाहनचालकांना या पाण्यातून तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागला. पादचारी वर्गाने तर हा मार्ग टाळावा लागला.
या पावसामुळे रविराज मंगल कार्यालय समोरील, गौरी हार्डवेअर समोरील एका घरात पाणी शिरले तर शेजारील गॅरेजमध्ये पाण्याचे तळे साचून वाहनांचे व इतर साहित्याचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दर वर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते, मात्र नगरपालिका नेहमीच डोळेझाक करते.
नाल्यांची साफसफाई वेळेवर न करणे, अतिक्रमणाबाबत ठोस कारवाई न करणे, तसेच पावसाळा पूर्वनियोजनाचा पूर्ण अभाव या सर्व गोष्टींना बीड नगरपालिका जबाबदार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. “नगरपालिकेला नाल्यासफाई व अतिक्रमण हटवणे केवळ कागदावरच राहिले आहे, प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही,” असे स्थानिक नागरिकांनी संतापाने सांगितले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती असेल तर पुढे अजून किती मोठा प्रश्न निर्माण होणार, याबाबत भीती व्यक्त होत असून नागरिक विचारत आहेत.“आता तरी बीड नगरपालिका जागे होणार का?असा सवाल उपस्थित होत आहे.




