गुटखा माफियांना एलसीबीचा दणका;१२ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त.
बीड शहर, सिरसाळा आणि युसुफ वडगाव येथे धडाकेबाज कारवाया;गुटख्यासह वाहने जप्त,आरोपी ताब्यात.

बीड(प्रतिनिधी) गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर वाहतुक व विक्रीवर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र राज रोज गुटखा विक्री होत असल्याचे दिसत आहे यामुळे बीड जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी धडाकेबाज कारवाया करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. बीड शहर, सिरसाळा आणि युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एलसीबीच्या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिल्या कारवाईत बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानकासमोर एक इसम गुटखा विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून २ लाख २१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, आशोक दुबाले, विकास राठोड, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परझने, आशपाक सय्यद व चालक पोहेकॉ नितीन वडमारे यांनी केली.
दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिरसाळा हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पवनेर (ता. परळी) येथे छापा टाकला. आरोपीच्या राहत्या घरातून व वाहनातून विविध कंपनीचा प्रतिबंधित पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस ठाणे सिरसाळा गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अंतर्गत कलम १२३, २७४, २७५, २२३ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जगन्नाथ तातेराव भरड (वय ५५, रा. पोहनेर ता. परळी, जि. बीड) याच्या ताब्यातून ३ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा गुटखा व २ लाख १० हजार रुपयांचा टेम्पो, असा ५ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई एचसी रामचंद्र केकान, एचसी गोविंद भताने आणि पीसी सचिन आंधळे यांनी केली. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली.
तिसऱ्या कारवाईत युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत एक इसम स्विफ्ट कारमधून गुटखा वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचा गुटखा आणि ४ लाख रुपयांची स्विफ्ट कार, असा ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जोगदंड, पठाण, गित्ते, घोडके व मराडे यांनी केली.
या कारवाया प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, पोलीस उपाधीक्षक वेंकटरमन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात तीन ठिकाणी कारवाया करून गुटखा माफियांना मोठा दणका दिल्याने जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











