सूचना फलक नसल्याने चारचाकी गेली खड्ड्यात !
कार पलटी होता/होता वाचली,बार्शी रोड झाला मृत्यूचा सापळा,PWD चा निष्काळजीपणा.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवर सुरू असलेल्या रस्ते कामामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून ठेवले असतानाही संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, रेडियम चिन्ह किंवा “काम सुरू आहे” असे दर्शविणारे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत.
या निष्काळजीपणाचा फटका शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला बसला. (एम.एच.२३-एडी ९२९१) क्रमांकाची गाडी थेट खड्ड्यात जाऊन आदळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली, मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवराज चौक ते बार्शी नाका दरम्यान कुठेही सूचना फलक नसल्याने वाहनधारक गोंधळात पडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना श्वसनाच्या तक्रारींचाही सामना करावा लागत आहे.
तसेच बार्शी रोडवरील असलेल्या सोमेश्वर मंदिरासमोर देखील सूचना फलक नसल्याने एखादा अपघात होऊन जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे यामुळे बांधकाम विभागाने वेळेत जागी होऊन सूचनाफलक व रेडियम लावावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भोपळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, तात्काळ कामाच्या ठिकाणी सूचना फलक व रेडियम चिन्हे लावण्याची मागणी केली आहे. भविष्यात एखादी जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अभियंता व ठेकेदारावर असेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






