डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 23 लाखांची फसवणूक करणारे पोलिसांच्या ताब्यात.
बीड सायबर पोलिसांची धडक कारवाई, तिघे अटकेत.

बीड (प्रतिनिधी) : “डिजिटल अरेस्ट”चा धाक दाखवत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीड सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत जळगाव येथील तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात परळी येथील सुर्यकांत निवृत्तीराव मुंडे यांची तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे बीड येथे गु.र.नं. 10/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66, 66(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुरावे गोळा करून तपासाची चक्रे फिरवली. तपासात आरोपी जळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत प्रसन्न अजय कासट (वय 31), स्वाती प्रसन्न कासट (वय 26) आणि संकेत दिपक बेलदार (वय 22) या तिघांना अटक केली.
आरोपी करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळवून आर्थिक फायदा घेत असल्याचे उघड झाले आहे. यातील एका आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या खात्यावरही पैसे जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीसांनी आरोपींकडून 3 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून 3 लाख 20 हजार रुपये बँक खात्यांमध्ये गोठवण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी आहे का तसेच इतर किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास केला जात आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस आधिकारी बीड यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे बीड चे पोनि निलेश केळे, सपोनि संदिप अराक, सफौ भारत जायभाये, पोह विजय घोडके, पो. अं. निलेश उगलमुगले, पो. अं. श्रीक्रष्ण टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण कक्ष येथील अश्विनकुमार सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
बीड जिल्हा पोलीसांचे नागरीकांना आवाहन आहे की, पोलीस असल्याची बतावणी करुण व्हिडीओ कॉल वर डिजीटल अरेस्ट करण्यात येत आहे असा कॉल आल्यावर यावर विश्वास ठेवु नये. डिजीटल अरेस्ट अशी कुठलीही संकल्पना कायद्यामध्ये नाही. तसेच असा कुठला कॉल आला अथवा सायबर फसवणुक झाली तर 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधुन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






