“चमत्कार”दाखवतो म्हणून लुटणारा पोलिसांच्या ताब्यात.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड, (प्रतिनिधी) केज बसस्थानकात प्रवाशांना ‘चमत्कार’ दाखवण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने लूट करणाऱ्या सराईत टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील काशीदवाडी येथील ५८ वर्षीय भीमा सोनाजी जाधवर हे १ फेब्रुवारी २०२६ रोजी उपचारासाठी पुण्याला जाण्यासाठी केज बसस्थानकावर थांबले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधत ‘चमत्कार’ दाखवण्याचे आमिष दिले. त्यांनी जाधवर यांच्याकडील सुमारे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन ती रुमालात ठेवत असल्याचे भासवले आणि ‘१० मिनिटे डोळे बंद करा’ असे सांगून आरोपी तेथून पसार झाले. काही वेळाने डोळे उघडल्यावर आपली फसवणूक झाल्याचे जाधवर यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयितांची ओळख पटली. पुढील गोपनीय माहितीवरून आरोपी नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरातील असून ‘मदारी’ खेळाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले.
त्यानुसार पथकाने येवला येथे सापळा रचून अफजल नवाब मदारी (रा. सावरगाव, ता. येवला) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. अटक आरोपीला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्यासह महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते व गणेश मराडे यांचा समावेश होता.
दरम्यान, बसस्थानक किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच ‘चमत्कार’ किंवा अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.










