गाव अंधारात:संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर धडक मोर्चा.
इंजिनीयरला झापले;वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १ एप्रिलला महामार्गावर आंदोलनाचा इशारा.

बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी आणि कपिलधारवाडी परिसरातील ग्रामस्थ गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सततच्या वीज खंडितीमुळे त्रस्त झाले असून संताप व्यक्त करत थेट महावितरण कार्यालय गाठले. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत बीड महावितरण कार्यालयात जाऊन इंजिनीयरला चांगले झापले.
इमामपूर रोड येथील सबस्टेशनवरून या गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, सततच्या तांत्रिक अडचणी आणि दुर्लक्षामुळे संपूर्ण परिसर अंधारात जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत असून शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अभियंत्यांना जाब विचारला. पाली येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे काम तात्काळ सुरू करावे तसेच गावठाण फिडरचे प्रलंबित काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. इतर गावांमध्ये फिडरची कामे पूर्ण झाली असताना पालीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी काम रखडल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीकडून कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
एकूणच, दीर्घकाळ सुरू असलेल्या वीज समस्येमुळे पाली परिसरातील नागरिकांचा संयम सुटत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येण्याची गरज आहे.






